भोंदू खरातच्या बायकोला कोर्टाचा झटका; सव्वा तासाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भोंदू खरातच्या बायकोला कोर्टाचा झटका; सव्वा तासाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

योगेश पांडे / वार्ताहर 

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात बुधवारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जवळपास सव्वा तास जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र राहाता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यावेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

कल्पना खरात ही ३१ मार्चपासून फरार आहे. तिच्यावर पती अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांमध्ये साथ दिल्याचा आरोप करण्यात आला होता. बँक व्यवहार आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये तिचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले होते. मात्र, न्यायालयात तिच्या वतीने मांडण्यात आलेल्या युक्तिवादात तिचा कोणत्याही व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आला. तिची सर्व बँक खाती अशोक खरात हेच हाताळत होते, असे तिच्या वकिलांनी सांगितले. बुधवारी सरकारी पक्ष, फिर्यादी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकील आणी तपास अधिकाऱ्याने आरोपीच्या वकिलाचे मुद्दे खोडून काढले.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात अनेक मुद्दे मांडले. फिर्यादीने दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, जमीन व्यवहार झाल्यानंतरही फिर्यादीने बराच काळ न्यायालयीन दाद मागितली नाही, असेही त्यांनी नमूद केले. अशोक खरात यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतरच जुन्या व्यवहारांचा मुद्दा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, संबंधित बैठकींमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती आणि व्यवहारांमध्ये तिचा सहभाग नव्हता, असा दावा करण्यात आला. मात्र न्यायालयाने सर्व मुद्दे ऐकून घेल्यानंतर कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी करण्यात आली. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या मागावर आहेत. कल्पना खरात ३१ मार्च पासून फरार असून आता शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातला शोधण्याचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon