मामाच्या घरी भाचीकडून डल्ला; सोन्याचे दागिने पोलिसांनी शौचालयातून काढत केला उलगडा

मामाच्या घरी भाचीकडून डल्ला; सोन्याचे दागिने पोलिसांनी शौचालयातून काढत केला उलगडा

योगेश पांडे / वार्ताहर 

गोंदिया – आधी दागिने चोरले अन् कारवाईच्या भीतीने चोरलेले दागिने शौचालयात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील शिवनी येथील चोरीच्या घटनेचा अखेर पोलिसांनी उलगडा केला. विशेष म्हणजे, भाचीनेच मामाच्या घरुन सोन्या-चांदीचे दागिने पळविले होते, मात्र कारवाईच्या भीतीने घरातीलच शौचालयात दागिने टाकून दिले. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या भाचीने मामाच्या घरातच २ लक्ष रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून कारवाईच्या भीतीने काही दागिने तलावात पुरुन ठेवले, तर काही दागिने घरातील शौचालयात टाकले होते. याप्रकरणी, पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तपासाअंती सत्य बाहेर आलं.

आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवणी येथील संगीता पाथोडे (३९) यांनी आमगाव पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नणंदेच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी आपले सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी संगीता पाथोडे यांच्याकडे दिले होते. हे दागिने संगिताने पिशवीत गुंडाळून घरातील बेडरुममधील लाकडी पेटीत ठेवले होते. परंतु, १४ मार्च रोजी आरोपी भाग्यश्री मेंढे ही भाची वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लहान मुलाला घेऊन संगीताकडे मुक्कामी आली होती. १४ मार्च रोजी सायंकाळी संगिताने ते दागिने भाग्यश्रीला दाखविले होते. ते दागिने पाहून भाग्यश्रीला मोह सुटला आणि सायंकाळ होताच कुणी आपल्याला बघत नसल्याची संधी साधून तिने ते दागिने आपल्या बॅगमध्ये टाकले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १५ मार्च रोजी ती आपल्या गावी भोसा येथे ते दागिने घेऊन निघून गेली.

इकडे घरात दागिन्यांची चोरी झाल्याचा कांगावा झाल्याने २२ मार्च रोजी दूरध्वनीवरून भाग्यश्रीला देखील विचारणा झाली. परंतु, तिने आपण चोरी केली नाही, असे सांगितले. दरम्यान सोन्याचे ३ हार, ३ जोड कानातले, ३ अंगठ्या, १ जोड पायल व ३ जोड नथ, असे एकूण २ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे आमगाव पोलिसांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस पथकाने संशयित आरोपी भाग्यश्री ही चोर असल्याचे उघडकीस आणले.

दरम्यान, पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने कारवाईच्या भीतीने काही दागिने शौचालयात टाकल्याचे तर काही दागिने हे कामठा येथील तलावात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खोदकाम करून दोन्ही ठिकाणचे दागिने हस्तगत केले आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon