मुंबईत भाजपच्या मोर्चामुळे झालेल्या गैरसोईबद्दल महापौरांकडून नागरिकांची दिलगिरी; विरोधकांवर साधला निशाणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नारीशक्ती वंदन विधेयकाला संसदेत विरोध केल्यामुळे भाजपने इंडिया आघाडीतील पक्षांविरोधात मुंबईतील वरळी इथं मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र हा मोर्चा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. भाजपच्या या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे एका संतप्त महिलेने भाजप नेत्यांसह पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला. या घटनेमुळे राजकीय आंदोलने आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसंच या मोर्चासाठी भाजपकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती की नव्हती, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी खुलासा करत नागरिकांना झालेल्या गैरसोयबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
वरळीतील आंदोलनाविषयी भूमिका मांडता रितू तावडे यांनी म्हटलं की,”वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित असून या मोर्चासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच हा मोर्चा काढण्यात आला होता. नागरिक व वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून योग्य नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु तरीही काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते,” असं तावडे यांनी म्हटलं आहे.
मी स्पष्ट सांगते की नारीशक्ती वंदन अधिनियम सुधारणा विधेयकाच्या विरोधाच्या माध्यमातून महिलांच्या राजकीय हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात हा आमचा ठाम आणि योग्य लढा आहे. महिलांना समान हक्क व राजकीय प्रतिनिधित्व नाकारण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हे केवळ आंदोलन नव्हतं, तर हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा आणि आमचा रोष ‘ती’ भगिनी व सर्व नागरिक समजून घेतील, अशी माफक अपेक्षा व्यक्त करते,” अशी भूमिका रितू तावडे यांनी मांडली.
दरम्यान, “आमच्या महायुती शासनाच्या प्रयत्नातून साकारलेले धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड, सिंदूर रेल्वे उड्डाणपूल आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे उड्डाणपूल यासह विविध पूल व सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते या तून दक्षिण मुंबईतील दैनंदिन वाहतूक पूर्वीपेक्षा नक्कीच सुलभ झाली आहे. आमच्या कामाची दखल घेण्याऐवजी महिलांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, हेच योग्य ठरेल,” असा टोलाही रितू तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे.