पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची १.४५ लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची १.४५ लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

पालघर : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सोन्याचे दागिने काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मनोर येथील दामोदर काशिनाथ चाफेकर (७१) हे १५ एप्रिल रोजी सकाळी मटण खरेदी करून परत येत असताना विठ्ठल मंदिराजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. “आम्ही पोलीस आहोत, परिसरात चोरीचे प्रकार वाढले आहेत. सोन्याचे दागिने घालून फिरल्यास दंड होतो,” असे सांगत त्यांनी चाफेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी काढून घेऊन कागदात गुंडाळून पिशवीत ठेवत असल्याचे भासवून हातचलाखीने दागिने लंपास केले.

या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान झायेद जावेद जाफरी (३८, रा. आंबिवली, कल्याण) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. आरोपीला १७ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत. आरोपीने यापूर्वी दादरा-नगर हवेली येथील सेल्वास परिसरातही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon