कर्जतमध्ये ‘शिलाई मशिन’ योजनेच्या आमिषाने ४.८२ लाखांची फसवणूक; ४३९ महिलांची पोलिसांत धाव
पोलीस महानगर नेटवर्क
कर्जत : स्वयंरोजगाराच्या नावाखाली शिलाई मशिन देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील ४३९ बचत गटांतील महिलांकडून तब्बल ४ लाख ८२ हजार ९०० रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्येकी ११०० रुपये ‘बुकिंग’च्या नावाखाली घेण्यात आले; मात्र एकाही महिलेला मशिन न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सुतार या २०१९ पासून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देत असल्याने त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने संपर्क साधल्याचे समोर आले आहे.
‘७५०० रुपयांत दोन शिलाई मशिन देतो, सध्या फक्त ११०० रुपये भरा,’ असे सांगून आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर सुतार आणि इतर महिलांनी तालुक्यातील ४३९ गरजू महिलांकडून रक्कम गोळा करून एकूण ४.८२ लाख रुपये आरोपीकडे सुपूर्द केले.
मात्र अनेक महिने उलटूनही मशिन न मिळाल्याने आणि पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ होत असल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. आरोपी फोनही उचलत नसल्याची तक्रार आहे.
दरम्यान, “शासकीय योजनेचा आभास निर्माण करून गरीब महिलांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्यात आला. आरोपीला तात्काळ अटक करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत,” अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे. तपासात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बचत गटांनी दिला आहे.