शरद पवारांना ‘बाप’ म्हणून राजकीय पोळी भाजली, आमदारकीचा तुकडा मिळताच पक्ष सोडणाऱ्यांनी सुप्रियाताईंवर बोलू नये : रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर तीव्र निशाणा साधला आहे. “शरद पवार साहेबांना बाप आणि सुप्रियाताई सुळे यांना मोठी बहीण म्हणून राजकीय पोळी भाजून घेतली. आमदारकीचा तुकडा मिळताच पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी सुप्रियाताईंवर टीका करण्याची हिंमत दाखवू नये,” असा घणाघाती प्रहार रोहिणी खडसे यांनी केला.
महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकार केल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. यावरून रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना ‘चित्रा-विचित्र’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले.
रोहिणी खडसे म्हणाल्या, “सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे खुलं आव्हान स्वीकारले तरी भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी दिसत आहे. चर्चेला येण्याची त्यांची हिंमतच नाही. आपण एक्सपोज होऊ, म्हणून ‘चित्रा’विचित्र माणसांना छू… म्हणत टाळाटाळ करत आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले, “या ‘चित्रा’विचित्र माणसांची जागा काय? आधी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप आणि सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून पदे मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. मग आमदारकीचा तुकडा मिळताच पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावरही पवार साहेब आणि सुप्रियाताई यांच्यावर सतत टीका करूनच त्यांचे राजकीय घर चालते. अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलण्याचा प्रयत्न करू नये.”
महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधकांविरोधात रान पेटवले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले असून, महिला आरक्षण विधेयकावर चर्चेसाठी कोणत्याही विरोधक नेत्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे खुलं आव्हान दिले होते.
यावर सुप्रिया सुळे यांनी त्वरित प्रतिक्रिया देत “मुख्यमंत्री सांगतील त्या ठिकाणी आम्ही चर्चेसाठी जाऊ,” असे सांगितले होते. मात्र, चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना ‘बारामतीच्या मोठ्या ताई’ म्हणत समकक्ष नेत्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. शरद पवार स्वतः चर्चेला तयार असतील तर मुख्यमंत्र्यांनाही तयारी असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले होते.
रोहिणी खडसेंच्या या तीख्या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.