विवाह संकेतस्थळावरून ओळख; शेअर बाजाराच्या आमिषाने तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा नऱ्हे परिसरात राहणारा असून त्याने विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्याच संकेतस्थळावरून त्याची एका तरुणीशी ओळख झाली. ओळख वाढवत संबंधित तरुणीने त्याला विश्वासात घेतले.
त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवत तरुणीने तक्रारदाराकडून पैसे उकळले. तिच्या सांगण्यावरून तक्रारदाराने सुमारे साडेपाच लाख रुपये तिच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही.
तक्रारदाराने संबंधित तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.