डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – तांत्रिक बिघाड आणि विलंब पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकानजीक लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याची घटना घडली. ही लोकल ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. त्यावेळी डोंबिवली स्थानकाच्या परिसरात या ट्रेनचा एक डबा रुळावरुन खाली घसरला. ही ट्रेन रिकामी असल्याने कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सोमवारी सकाळी ऑफिसला जाण्याच्यावेळी ही लोकल ट्रेन डबा रुळावरुन खाली घसरल्याने अडकून पडले. त्यामुळे या मार्गावरील अन्य लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे पुढील काही तास प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने चालत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. मध्य रेल्वेकडून अपघातग्रस्त लोकल ट्रेन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
या अपघातामुळे मध्य रेल्वेचे सोमवारी दिवसभराचे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. एक लोकल ट्रेन थांबल्याने त्याच्यामागे असणाऱ्या लोकल ट्रेनचा खोळंबा झाला. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या तीन लोकल ट्रेन ठाकुर्ली, कल्याण स्थानकाच्या परिसरात रुळावर थांबल्या.मध्य रेल्वेकडून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात आले.यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. हा अपघात नेमका कसा घडला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.