अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा, पीडिता पाच महिन्यांची गर्भवती
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : शहरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, सुरक्षा रक्षकाने धमकावून १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारांमुळे संबंधित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. पुणे येथील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेशकुमार (वय २५, रा. जयजवान नगर, येरवडा) असे आरोपीचे नाव असून, तो संबंधित सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. या प्रकरणी मुलीच्या आईने (वय ४२) फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तसेच, घटनेबाबत कोणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती दाखवत तो तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता. काही दिवसांपूर्वी मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे झालेल्या तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर, लक्ष्मीनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. दरम्यान, प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत करीत आहेत.