ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती; २३० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कासारवडवली पोलीस स्टेशन आणि CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने हिरानंदानी इस्टेट परिसरातील न्यू होरायझन स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता आठवीतील सुमारे २३० विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’, सायबर गुन्हे व ऑनलाइन सुरक्षितता, शाळेत तसेच शाळेनंतरची वैयक्तिक सुरक्षा, महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि नव्या बीएनएस कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सतर्क राहण्याचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत कशी मिळवावी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर लिंगरे आणि सहायक पोलीस निरीक्षक वसंत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापक सौ. ज्योती नायर आणि समन्वयक सौ. मनाली मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला.
CAWSE Foundation च्या सौ. कल्पना मोरे, श्री. रुद्र मोरे आणि सौ. भाग्यश्री मानोरे यांनीही विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान आपत्कालीन मदत क्रमांक ११२ आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.