लातूरमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करून अंगठी लुटणाऱ्यांना अटक; पोलिसांची तत्पर कारवाई

लातूरमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करून अंगठी लुटणाऱ्यांना अटक; पोलिसांची तत्पर कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क 

लातूर : शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अल्पावधीत अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या जलद व प्रभावी तपासाचे कौतुक होत आहे.

या प्रकरणात फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय १७, रा. माळी गल्ली, पटेल चौक) यांनी १४ मार्च २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी सुमारे २ वाजता ते मित्रांसह घरी जात असताना, अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर) व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या हातातील सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी तातडीने तपासाचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यात आला. त्यानुसार अजय दिलीप काळे आणि देवेंद्र शिवराम सलगर (दोघे रा. कातपूर रोड) यांना १६ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ७५ हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे ६० हजार रुपये) असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी विशेष कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon