डोंबिवली स्कायवॉकवर दिवसाढवळ्या चाकूच्या धाकावर लूट; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेकडील स्कायवॉकवर दिवसाढवळ्या घडलेल्या लुटीच्या घटनेमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गाला (रा. श्रीखंडेवाडी) हे व्यवसायाने व्यापारी असून मानपाडा रोडवरील पांडुरंगवाडी येथे त्यांचा कॉस्मेटिक्सचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते मुलुंड येथे गेले होते. काम आटोपून डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरल्यावर ते पूर्वेकडील इंदिरा चौकाकडे जाण्यासाठी स्कायवॉकवरून जात असताना ही घटना घडली.
स्कायवॉकवर समोरून आलेल्या एका इसमाने मुद्दाम गाला यांना जोराचा धक्का देत वाद घातला. काही क्षणांतच त्याने खिशातून चाकू काढून गाला यांना धमकावले. “जास्त हालचाल केली तर इथून जाऊ देणार नाही, माझी माणसं आसपास आहेत,” अशी धमकी देत त्याने गालांच्या खिशातून जबरदस्तीने सुमारे १० हजार रुपये काढून घेतले.
लूट केल्यानंतर आरोपी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसार झाला. गाला यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पुन्हा धमकावत “जास्त केलंस तर पुलाखाली फेकून देईन,” अशी धमकी देत तेथून पळ काढला.
घटनेनंतर घाबरलेल्या गाला यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकारामुळे डोंबिवली पूर्वेतील स्कायवॉकवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी गस्त वाढवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.