कल्याण पूर्वेत थरारक घटना : कौटुंबिक वादातून पित्याचा अडीच वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

कल्याण पूर्वेत थरारक घटना : कौटुंबिक वादातून पित्याचा अडीच वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण पूर्वेतील खडेगोळी परिसरात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका पित्याने स्वतःच्या अडीच वर्षांच्या मुलीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दिनकर आणि तिचा पती विलास दिनकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी माहेरी मध्यप्रदेशात गेली होती. दरम्यान, आरोपी विलास दिनकर तेथे जाऊन मुलगी अदितीला घेऊन कल्याणमध्ये आला आणि काही दिवस मुलीसह बेपत्ता होता.

गुरुवारी सकाळी संतापाच्या भरात आरोपीने मुलगी अदितीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने प्रसंगावधान राखत तात्काळ हस्तक्षेप केल्याने मुलीचा जीव वाचला.

गंभीर जखमी अवस्थेत अदितीला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारांबाबत आईने निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यानंतर मुलीची प्रकृती खालावल्याने तिला कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विलास दिनकर फरार असून कोळसेवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच सेंट्रल रुग्णालयातील उपचारप्रक्रियेबाबतही चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon