५० हजारांच्या लाचेची मागणी; ठाण्यात एसीबीचा सापळा, महिला अधिकाऱ्यासह दोघे रंगेहात अटकेत

५० हजारांच्या लाचेची मागणी; ठाण्यात एसीबीचा सापळा, महिला अधिकाऱ्यासह दोघे रंगेहात अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. ना हरकत प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील दोन अधिकाऱ्यांना एसीबीने सापळा रचून रंगेहात अटक केली.

वनपाल विलास सानप आणि वनसंरक्षक रेखा गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराने नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी वनविभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदार आणि आरोपींमध्ये चर्चेनंतर २५ हजार रुपयांवर तडजोड झाली. बुधवारी तक्रारदार लाच देण्यासाठी गेला असता एसीबीच्या पथकाने कारवाई करत दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून एसीबीकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon