भाजी विक्रीसाठी दिलेल्या गाळ्यांवर इतर उद्योग उभारल्याने डोंबिवलीतील भाजी मंडईवर मोठी कारवाई; तब्बल ११४ दुकाने सील

भाजी विक्रीसाठी दिलेल्या गाळ्यांवर इतर उद्योग उभारल्याने डोंबिवलीतील भाजी मंडईवर मोठी कारवाई; तब्बल ११४ दुकाने सील

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – डोंबिवलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील भाजी मंडईवर मोठी कारवाई करण्यात आली असून ११४ दुकाने सील करण्यात आली आहे. भाजी विक्रीसाठी दिलेल्या गाळ्यांवर इतर उद्योग उभारले गेले, त्यामुळे ही कारवाईत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही गाळे रिकामे करत असून पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व स्टेशनबाहेरील उरसेकर वाडी परिसरातील मधुबन सिनेमासमोरील भाजी मार्केटच्या गळ्यावर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त भरत पवार, प्रसाद ठाकूर आणि मालमत्ता कर विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत एकूण ११४ दुकाने सील केली. या मोठ्या कारवाईने विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा मूळतः भाजी मार्केटसाठी वाटप करण्यात आली होती, परंतु अनेक व्यापाऱ्यांनी ओट्यावर कायमस्वरूपी दुकाने बांधून शटर लावले होते, जे नियमांच्या विरुद्ध आहे. या अनियमिततेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता संबंधित दुकानदारांच्या करारांची तपासणी केली जाईल. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल किंवा बेकायदेशीरपणे दुकान भाड्याने दिले असेल, तर त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई केली जाईल. या वेळी पोलीसही तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान, काही दुकानदारांनी निषेध नोंदवला आणि पालिकेला आताच का कारवाई आठवण झाली? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon