पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार!
बनावट ‘हिंदू’ ओळख, बनावट लग्न आणि लाखोंची फसवणूक; आरोपी राजू सिकंदर शेख याला पुण्यातून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून (इंस्टाग्राम) प्रेमाचे जाळे टाकून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर बनावट हिंदू नाव आणि ओळख तयार करून एका भामट्याने २९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी आरोपी राजू सिकंदर शेख याला पुण्यातून अटक केली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, बीड जिल्ह्यातील “राजू सिकंदर शेख” या मुस्लिम व्यक्तीने इंस्टाग्रामवर “अजय म्हस्के” या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्याद्वारे त्याने पालघरमधील पती पासून विभक्त राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेशी ओळख वाढवली. संवाद वाढवत त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर आरोपीने मंदिरात नेऊन सिंदूर आणि कुंकू लावून ‘लग्न’ झाल्याचा दिखावा केला. या बनावट नात्याच्या आधारावर पुढील सहा महिन्यांत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून, तसेचे विविध कारणे सांगत पीडितेकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा लागले, जेव्हा आरोपीच्या पत्नीने पीडितेला फोन करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे थांबवण्यासाठी तिने २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले. या धमक्यांमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली. घाबरलेल्या पीडितेने बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. अटक टाळण्यासाठी आरोपीने पीडितेला वारंवार मुंबई आणि पुणे येथे बोलावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
बजरंग दलाचे पालघर प्रमुख मुकेश दुबे यांनी हा ‘लव्ह जिहादचा’ प्रकार असल्याचा दावा केला असून, आरोपीने याच पद्धतीने आणखी तीन महिलांची फसवणूक केली असून दोन महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिस या सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात आरोपीवर फसवणूक, ब्लॅकमेल, खोटी ओळख तयार करणे आणि खंडणी मागणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पत्नी आणि खंडणी वसूल करण्यासाठी आलेल्या साथीदारालाही सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर बनावट ओळख वापरून महिलांना फसवणुकीच्या घाटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तरुणीनी याबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते. त्यामुळं सतर्क राहाल तर सुरक्षित राहाल असेच म्हणावं लागेल.