नाशिकमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; महिलेचा कोयत्याने हल्ला, आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : शहरातील विल्होळी परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करत त्याचा खून केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने या प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला असून, हल्ल्यादरम्यान कोणीही मदतीसाठी पुढे न आल्याचे दिसून येते. हल्ल्यावेळी एक पुरुषही महिलेच्या बाजूला उभा असल्याचे व्हिडिओत आढळते.
हल्ल्यानंतर संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती दुचाकीवरून पळून गेले. ओळख पटू नये म्हणून त्यांनी वाहनाची नंबर प्लेट झाकल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसून महाराष्ट्र पोलीस यांच्या नाशिक ग्रामीण विभागाकडून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.