भाताच्या कोंड्यात दडवले ‘एक कोटींचे’ मद्य; १२७० बॉक्स जप्त, दोघांना अटक

Spread the love

भाताच्या कोंड्यात दडवले ‘एक कोटींचे’ मद्य; १२७० बॉक्स जप्त, दोघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : भाताच्या कोंड्याच्या पोत्यांमध्ये लपवून मद्याची तस्करी करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघड केला असून, सुमारे एक कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली असून, हा साठा पंजाबकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गारगोटी रोडवरील हणबरवाडी गाव येथे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भरत सुखराम गुरूंग (३३, रा. सिमला, हिमाचल प्रदेश) आणि सुनीलकुमार प्रेमसिंह ठाकूर (३२, रा. सिमला, हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कागल विभागाला गोव्यात तयार केलेले मद्य ट्रकद्वारे बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित ट्रक अडविण्यात आला. प्राथमिक तपासणीत ट्रकमध्ये भाताच्या कोंड्याची पोती आढळली. मात्र, खात्रीलायक माहितीच्या आधारे ही पोती हटवून तपासणी केली असता आत मद्याचे बॉक्स लपवलेले आढळले.

ट्रकमधून सुमारे १२७० बॉक्स, म्हणजेच अंदाजे ११ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बॉक्सभोवती कोंड्याची पोती ठेवून तस्करीचा प्रयत्न करण्यात आला होता. जप्त केलेला ट्रक पुढील तपासासाठी दुधाळी येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात नेण्यात आला.

या कारवाईत अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर आंबेरकर व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

दरम्यान, जप्त मद्यावर ‘मध्य प्रदेशात विक्रीसाठी’ असा उल्लेख असूनही हा साठा पंजाबकडे नेण्यात येत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुरवठा साखळीचा तपास सुरू असून, मद्य तयार करणारे आणि खरेदीदार यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon