केवायसीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; जळगावातील ‘लाडकी बहीण’ योजनेतून धक्कादायक प्रकार

Spread the love

केवायसीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; जळगावातील ‘लाडकी बहीण’ योजनेतून धक्कादायक प्रकार

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव : राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने एका महिलेची विनयभंगाची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी गोकुळ रमेश चव्हाण (३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय महिलेच्या खात्यावर नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या कालावधीतील योजनेचे पैसे जमा झाले नव्हते. केवायसी प्रक्रियेसाठी मदत मिळावी म्हणून तिने पतीच्या ओळखीतील गोकुळ चव्हाण याच्याशी संपर्क साधला होता. २५ जानेवारी २०२६ रोजी तो कागदपत्रे घेण्यासाठी महिलेच्या घरी गेला. त्यावेळी ‘काम करून देतो’ असे सांगत आरोपीने महिलेपुढे शारीरिक संबंधांची मागणी केली, तसेच हा प्रकार कुणालाही कळू देणार नाही, असेही म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घडलेला प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्याने आरोपीला समज देत पुन्हा घराजवळ न येण्याची ताकीद दिली. मात्र त्यानंतरही चव्हाण हा महिलेच्या घरासमोर वारंवार फिरकत राहिला व तिचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून महिलेने ८ एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली.

याशिवाय, परिसरातीलच आणखी एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याच्या बहाण्याने आरोपीने प्रेमसंबंधाची मागणी केल्याचेही समोर आले आहे.

गोकुळ चव्हाण हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करत असून जळगाव शहरात त्याचे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असून रोहिणी खडसे यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon