पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेल्या कारमध्ये कोंबून व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला बेड्या; पाच जणांना अटक

Spread the love

पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेल्या कारमध्ये कोंबून व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला बेड्या; पाच जणांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

रत्नागिरी – पांडुरंग लिहिलेली थार गाडी व भारत सरकार असा लोगो असलेली इनोव्हा गाडी दोन्ही गाड्यांमधून पटापट काहीजण उतरले आणि एकाला गाडीत जबरदस्ती कोंबून घेऊन रोकड लुटल्याचा मोठा प्रकार घडला आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या आंबा घाटातील थरारक प्रकार बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. मात्र, देवरुख पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासाची सूत्र हलवत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर आंबा घाटातील दख्खन येथे म्हैस घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाला अडवून, चाकूचा धाक दाखवत मारहाण आणि लूटमार करणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंग लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने
काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम व त्यांच्यासोबत अवघ्या तीन पोलिसांच्या टीमने घाट परिसर पिंजून काढला. त्याचवेळेला एका आड वाटेला असलेल्या पांडुरंग कृपा वर्णनाची गाडी दिसली व त्याचठिकाणी हे सगळे संशयित आरोपी दारू पिताना बसलेले दिसले. अवघ्या तीन जणांच्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता कौशल्य पणाला लावत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील दोन जण पळून जाण्यास यशस्वी ठरले असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या पाच जणांना देवरुख न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेनंतर प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि लांजा पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फरहान रशिद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६) या पाच जणांना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.

या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon