AI च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक

Spread the love

AI च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – तंत्रज्ञानाचा वापर जिथे प्रगतीसाठी व्हायला हवा, तिथे गुन्हेगार याचा वापर फसवणुकीसाठी कसा करतात, याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिन्नर तालुक्यात उघडकीस आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला वावी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आसिफ तडवी असून तो मूळचा सिल्लोडचा रहिवासी आहे. तडवीने सोशल मीडियावर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बनावट नावाने खाती उघडली होती. त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस ठाण्यात बसलेले आणि पोलीस गणवेशातील अत्यंत हुबेहूब दिसणारे फोटो तयार केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तो महिलांवर आपली छाप पाडत असे.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने एका महिलेशी संपर्क साधला. खाकी वर्दीचा रुबाब दाखवून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, कधी घरगुती अडचणींचे कारण तर कधी पोलीस ट्रेनिंगचा बहाणा सांगून त्याने या महिलेकडून तब्बल ३ लाख रुपये उकळले. जेव्हा पीडित महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तडवीने आपले खरे रूप दाखवले. त्याने AI च्या मदतीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.पीडित महिलेने धीर धरून वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. संशयित आसिफ तडवी हा महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आला असता, वावी पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी तडवीचे दोन मोबाईल जप्त केले असून, त्यामध्ये मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. मोबाईलमध्ये AI ने तयार केलेले पोलीस ठाण्यातील आणि वर्दीतील शेकडो फोटो आढळले आहेत. तडवीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांसोबत केलेले चॅटिंग, स्क्रीनशॉट आणि काही अश्लील व्हिडिओ देखील सापडले आहेत. यावरून त्याने केवळ एकाच महिलेला नाही, तर अनेक महिलांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढून लुटल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon