न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार; खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोर्टात हजर केल्या नंतर जेलमध्ये जाताना फरार

Spread the love

न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार; खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोर्टात हजर केल्या नंतर जेलमध्ये जाताना फरार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयातून मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी हॅरिसन अँथनी जोसेफ (४२) हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. त्याने मोठ्या चलाखीने पोलीसांनी गुंगारा दिला. कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आता तो कोर्ट परिसरातून दिसेनासा झाला. त्यामुळे पोलीसांची एकच धांदल उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २:१० ते २:२० च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत श्रीमंत कांबळे (२८) हे आरोपी हॅरिसनला सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहातून सत्र न्यायालयात घेवून आले होते. त्याला कोर्टरूम क्रमांक १० मध्ये हजर ही करण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, हॅरिसनसह इतर चार आरोपींना न्यायालयाच्या लॉकअपमध्ये नेण्यासाठी पोलीस पथक तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होते. याच वेळी आरोपी हॅरिसने संधी साधली.

पोलिसांचे पथक दुसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, आरोपी हॅरिसनने पोलीस कर्मचाऱ्याला अचानक जोराचा धक्का दिला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिसांची पकड ढिली होताच त्याने तेथून पळ काढला. या घटनेची औपचारिक नोंद त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवाय त्याला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्ही मध्ये आरोपी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पळताना स्पष्ट दिसत आहे. आरोपीवर यापूर्वीच हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपी रेल्वेने पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचे एक पथक कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस कडे रवाना झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon