दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; गेट तोडून कारची घुसखोरी, ‘सिक्युरिटी ब्रीच’ची चौकशी सुरू

Spread the love

दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; गेट तोडून कारची घुसखोरी, ‘सिक्युरिटी ब्रीच’ची चौकशी सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

नवी दिल्ली : राजधानीतील विधानसभा परिसराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना सोमवारी उघडकीस आली. एका अज्ञात कारने थेट मुख्य प्रवेशद्वाराला धडक देत आत प्रवेश केल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धांदल उडाली. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाला संभाव्य ‘सिक्युरिटी ब्रीच’ मानत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश नोंदणी असलेली एक कार गेट क्रमांक २ वरून जबरदस्तीने आत शिरली. या धडकेत लोखंडी गेटचे नुकसान झाले. कार चालवणारी व्यक्ती तोंड झाकून होती. वाहन थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने गेले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चालकाने पोर्चजवळ फुलांचा गुच्छ ठेवून तातडीने तेथून पलायन केले. सुदैवाने त्या गुच्छामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरीही, उच्च सुरक्षा असलेल्या परिसरात अशा प्रकारे वाहन घुसल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून संशयित वाहनाचा क्रमांक यूपी-२६-एझेड-८०९० असल्याचे समोर आले आहे. पुढील तपासात चालकाची ओळख सरबजीत सिंह अशी पटली असून संबंधित कार रुपनगर येथून जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, अलीकडेच अधिवेशनादरम्यान विधानसभेला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon