महाडमध्ये गुरु-शिष्य नात्यावर कलंक; खासगी क्लास शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड : महाड तालुक्यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. खासगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडमधील ‘गांधी क्लासेस’ येथे हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. संबंधित क्लासचे संचालक व शिक्षक सुनील गांधी याच्यावर विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक विद्यार्थ्याशी अश्लील वर्तन करत असे. शिकवणीच्या निमित्ताने त्याला एकांतात नेऊन गैरप्रकार केल्याचेही समोर आले आहे. या सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. अखेर त्याने धाडस करून घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण’ (POCSO) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, आरोपीने इतर विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे त्रास दिला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.