शिवाजीनगर-गोवंडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; गुन्हे शाखेचा छापा, दोघे जेरबंद
सुधाकर नाडार / प्रतिनिधी

मुंबई : वैद्यकीय पदवी व परवाना नसताना नागरिकांवर उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने कारवाई करत त्यांना अटक केली. शिवाजीनगर-गोवंडी परिसरातील दोन क्लिनिकवर टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला.
विश्वसनीय माहितीनुसार, आरोपी कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करून उपचार करत होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क वसूल करत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित क्लिनिकवर छापे टाकले.
या कारवाईत राजीव कपिलदेव रंजन (वय ३४) आणि कुबेरनाथ गोमती यादव (वय ५६) हे दोघे रुग्णांवर उपचार करताना आढळले. तपासात त्यांच्या कडे कोणताही वैध वैद्यकीय परवाना नसल्याचे तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून इंजेक्शनच्या बाटल्या, सिरिंज, अँटीबायोटिक औषधे तसेच इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सह पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली.
या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला असून, पुढील तपास सुरू आहे.