रस्ता अडवणाऱ्या रिक्षेबाबत सूचनेवरून तरुणावर जीवघेणा हल्ला; कल्याण पूर्वेत खळबळ

रस्ता अडवणाऱ्या रिक्षेबाबत सूचनेवरून तरुणावर जीवघेणा हल्ला; कल्याण पूर्वेत खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : केवळ रस्ता अडवून उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व पेव्हर ब्लॉक्सने क्रूर मारहाण केल्याची धक्कादायक घटना आनंदवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित नवाज शेख हा तरुण आपल्या कामानिमित्त जात असताना रस्त्यात उभी असलेली रिक्षा अडथळा ठरत होती. त्याने रिक्षाचालकाला विनम्रपणे वाहन बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र, या सूचनेचा राग मनात धरत रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी नवाजशी वाद घालत अचानक हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी हातापायांसह लोखंडी रॉड आणि रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक्सचा वापर करत नवाजवर जीवघेणे वार केले. या मारहाणीत नवाजच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. तसेच, हल्लेखोरांनी त्याच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर जखमी नवाजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon