प्रेमातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाला ‘एमडी’चा ट्विस्ट; आरोपीकडून अंमली पदार्थ जाळ्याचा पर्दाफाश
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : उत्तमनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात धक्कादायक वळण आले आहे. प्रेमसंबंधातून मुलगी आरोपीसोबत पळून गेल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून, आरोपीने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचेही उघड झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा म्हणून तपास सुरू असताना या सापडलेल्या अंमली पदार्थामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
चौकशीत आरोपीने अनेकांना अंमली पदार्थांची विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू केली. तपासादरम्यान गेल्या काही महिन्यांत लाखोंची उलाढाल, संशयास्पद कॉल्सची मालिका आणि विविध तरुणांशी असलेला संपर्क समोर आला.
या सर्व बाबींमुळे एका मोठ्या अंमली पदार्थांच्या जाळ्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला आहे. आरोपीच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, लवकरच आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.