चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत खूनप्रकरण उघड, दोघे अटकेत

Spread the love

चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत खूनप्रकरण उघड, दोघे अटकेत

योगेश पांडे / वार्ताहर

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरात जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांत खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी दोघांना अटक केली.

२८ मार्च रोजी आंब्याच्या बागेजवळील दरीत संशयास्पदरीत्या जळालेल्या अवशेषांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक पाहणीत हाडांचे तुकडे व इतर साहित्य आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. फॉरेन्सिक तपासणीअंती हे अवशेष मानवी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान घटनास्थळाशी संबंधित माहितीच्या आधारे विशाल खोडदेकर (२८) याला ३१ मार्च रोजी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याची सहकारी जन्नतुनिसा खान हिलाही १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्यामागील हेतू आणि पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. जलद आणि समन्वयपूर्ण कारवाईबद्दल पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon