ओला राईड प्रकरणात एमएफसी पोलिसांची तत्परता; चालक तासाभरात ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : ओला राईडमध्ये ११ वर्षांची मुलगी एकटी असल्याचे समोर आल्यानंतर आणि चालकाचा संपर्क तुटल्याने निर्माण झालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित चालकाला अवघ्या एका तासात ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी प्रवासासाठी ओला राईडने निघाली होती. काही वेळानंतर चालकाचा संपर्क होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने शोध सुरू केला. मुलगी एकटीच वाहनात असल्याचे स्पष्ट झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.
घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेसी यांनी स्वतः लक्ष घालत तपासाची सूत्रे हाती घेतली. संबंधित ॲपच्या माध्यमातून वाहनाची लोकेशन मिळवून पोलिसांनी तातडीने हालचाल करत एक तासाच्या आत वाहनाचा शोध लावला आणि चालकाला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा राईड्सदरम्यान अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पालकांनी मुलांना एकटे पाठवताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.