मुंबई महापालिकेच्या इतिहासात नवा अध्याय; ‘मेट्रो वुमन’ अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

Spread the love

मुंबई महापालिकेच्या इतिहासात नवा अध्याय; ‘मेट्रो वुमन’ अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेच्या हाती आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली असून, हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या निवृत्तीनंतर या पदासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती.

या पदासाठी संजय मुखर्जी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, मनीषा वर्मा आणि व्ही राधा यांची नावे चर्चेत होती. यापैकी काही अधिकारी वरिष्ठ असतानाही, वरिष्ठता बाजूला ठेवत भिडे यांची निवड करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

१९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या भिडे यांनी यापूर्वी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना मेट्रो लाईन ३ प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे त्यांना ‘मेट्रो वुमन’ अशी ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी नुकतीच भेट घेतल्यानंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणूनही भिडे यांची ओळख आहे.

महापालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना भिडे यांच्यासमोर मुंबईतील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या आव्हानांचा डोंगर असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon