लग्नानंतरही दोघांच्या प्रेमाचा भयानक अंत; नेपाळी प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या

Spread the love

लग्नानंतरही दोघांच्या प्रेमाचा भयानक अंत; नेपाळी प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – अनैतिक संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ एका महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मनीषा खम्म दमाई असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी आरोपी प्रकाश अर्जुन तिखात्री याला अटक केली आहे. या घटनेबाबत किशन भरत परिहार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी प्रकाश तिखात्री याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या वाडा हॉटेलच्या मागील बाजूच्या जंगल परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार १८ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश अर्जुन तिखात्री, मृत महिला मनीषा दमाई आणि तक्रारदार किशन परिहार हे मूळचे नेपाळचे असून पुण्यात रखवालदार म्हणून काम करत होते. मनीषा ही किशनची बहीण आहे. प्रकाश आणि मनीषा दोघेही विवाहित असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र, प्रकाशला हे संबंध संपवायचे होते, पण मनीषा त्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला भिलारवाडीच्या जंगलात नेऊन दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

मनीषा बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली. तपासात प्रकाशचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, घटनास्थळही दाखवले. किशन परिहार यांनी मृतदेहाची ओळख पटवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्यासह आंबेगाव पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले आणि पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच परिसराची तपासणी करून पुढील तपासाच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon