ठाण्यात कोडीनयुक्त कफसिरपचा अवैध साठा उघड; २६ वर्षीय आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कोडीनयुक्त कफसिरपचा बेकायदेशीर साठा करून विक्रीसाठी आणणाऱ्या एका आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत ३५ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी पोलीस शिपाई तानाजी पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, उत्तरप्रदेश येथील मोहम्मद सय्यद हा कोडीन फॉस्फेटयुक्त कफसिरपच्या बाटल्या विक्रीसाठी ठाणे पश्चिम येथील साकेत रोडवरील नाल्याजवळील पुलावर येणार आहे. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस व पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे यांच्या पथकाने सापळा रचला.
सदर कारवाईत मोहम्मद सरफराज इस्माईल सय्यद (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १०० मि.ली. क्षमतेच्या कोडीनयुक्त ‘अॅनरेक्स’ कफसिरपच्या १२० बाटल्या, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ३५,८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८(क), २२(क) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस करीत आहेत.
या कारवाईमुळे ठाणे शहरातील औषधांच्या अवैध विक्रीविरोधातील कारवाईला वेग मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.