पिंपरीतील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपरीतील स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची खात्री करून छापा टाकला. याप्रकरणी व्यवस्थापक अक्षय सुतार याला अटक करण्यात आली असून चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा प्रकारच्या आठ आस्थापनांवर कारवाई करत २० आरोपींना अटक केली असून १७ महिलांची सुटका केली आहे. पुढील काळातही अशा कारवाया तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.