डोंबिवलीत शिक्षिकेचा छळ; ट्रस्टीच्या मुलावर गंभीर आरोप, पोलिसांकडून ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : शहरातील सागाव परिसरातील जय भारत हायस्कूलमध्ये एका शिक्षिकेला अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांचा मुलगा सरवना अय्यर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सरवना अय्यर याने वारंवार अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित शिक्षिकेने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच काही डोंबिवलीकरांनी शाळेत धडक देत आरोपीविरुद्ध संताप व्यक्त केला.
आरोपीला तातडीने ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सुमारे तासभर शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला शांत केले. त्यानंतर ट्रस्टी शिवा अय्यर यांच्या सहकार्याने पोलिसांनी सरवना अय्यर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ट्रस्टी शिवा अय्यर यांनी, “माझा मुलगा दोषी आढळल्यास त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे स्पष्ट केले.
सध्या मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.