‘प्रोजेक्ट संजीवनी’तून १४ आत्मसमर्पित माओवादींच्या नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वी
पोलीस महानगर नेटवर्क
गडचिरोली : मुख्य प्रवाहात पुनर्स्थापनेसाठी प्रयत्नशील असलेल्या गडचिरोली पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या नसबंदी रिओपनिंग (पुनर्जोडणी) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या.
गडचिरोली पोलीस दल आणि सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मा. दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे २१ मार्च २०२६ रोजी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ तर गोंदिया जिल्ह्यातील १ अशा एकूण १४ आत्मसमर्पित सदस्यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट होऊन सामान्य कौटुंबिक जीवन जगण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुनर्वसन प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात येत असून, संबंधित सदस्यांना नव्याने आयुष्य उभारण्याची संधी उपलब्ध होत आहे.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून आतापर्यंत एकूण ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे पुनर्वसन, सामाजिक पुनर्स्थापना आणि त्यांचे कौटुंबिक आयुष्य अधिक सुखकर व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.