टोमणे मारल्याच्या आणि रागाने बघण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या; पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

टोमणे मारल्याच्या आणि रागाने बघण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या; पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये केवळ टोमणे मारल्याच्या आणि रागाने बघण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांमधील वादाने हिंसक वळण घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. किरकोळ वादाचे रूपांतर एका तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने उल्हासनगरमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील शिवनेरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्रवीण वर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची शेजारी राहणाऱ्या शुभम पाटील याने हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हा वारंवार शुभमला बघून टोमणे मारायचा, त्याच्याकडे रागाने बघायचा आणि कधी कधी शिव्याही द्यायचा.या सततच्या वागणुकीमुळे शुभमच्या मनात प्रचंड राग साचला होता. सोमवारी संध्याकाळी हा राग अनावर झाला आणि शुभमने प्रवीणवर दगडाने हल्ला करून त्याला संपवले.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही हत्या झाली, तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पोलिसांना या कृत्यामागे शुभम पाटील असल्याचे सांगितले. उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला शोधण्यासाठी ४ पथके रवाना केली होती. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपी शुभम पाटील याला अटक केली आहे.

अटक केल्यानंतर आरोपी शुभम पाटील याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने तपासासाठी वेळ मागितली असता, न्यायालयाने आरोपीला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या भीषण हत्या प्रकरणात शुभमचा आणखी कोणी साथीदार आहे का? किंवा यामागे अजून काही मोठे कारण आहे का? याचा शोध आता उल्हासनगर पोलीस घेत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शिवनेरी परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon