दादर स्थानकावर लोकलला झटका; घाबरलेल्या प्रवाशांची धावपळ, मोठा अपघात टळला

Spread the love

दादर स्थानकावर लोकलला झटका; घाबरलेल्या प्रवाशांची धावपळ, मोठा अपघात टळला

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी सायंकाळी लोकलला अचानक जोराचा झटका बसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्याने क्षणभर गोंधळ उडाला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बोरिवलीहून सायंकाळी ४.५० वाजता सुटलेली चर्चगेट फास्ट लोकल सुमारे ५.३३ वाजता दादर स्थानकात दाखल झाली. यावेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता निर्माण झाली. काही क्षण थांबल्यानंतर ट्रेनने अचानक जोराचा झटका देत पुढे हालचाल केली. या अनपेक्षित प्रकारामुळे डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

ट्रेन थांबली असे समजून काही प्रवासी उतरण्यासाठी पुढे सरसावले होते. मात्र ट्रेन पुन्हा हलू लागल्याने अनेकांनी घाईघाईत उड्या मारल्या. काही प्रवासी डब्यांमध्येच पडल्याचे, तर काही जण ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत पडण्यापासून थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेनंतर संबंधित लोकल दादर ते प्रभादेवी दरम्यान चार ते पाच वेळा थांबत पुढे सरकत होती. चालकाने सतत हॉर्न वाजवत सावधगिरीने गाडी पुढे नेली. प्रभादेवी स्थानकावर पोहोचताच जीआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू असून ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का याचा तपास केला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon