कल्याणात ‘पमी गुरू’चा भोंदूगिरीचा प्रकार; व्हायरल व्हिडिओंनी खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : नाशिकनंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘पमी गुरू’ नावाच्या तृतीयपंथी गुरूचे अजब दावे, अंधश्रद्धा पसरवणारे संदेश आणि आलिशान जीवनशैली दाखवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून अंधश्रद्धेला राजकीय मंडळी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचेही अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ‘पमी गुरू’ अंगावर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान करून दिसत आहेत. तसेच महागड्या गाड्या, आलिशान घर आणि ऐश्वर्यशाली जीवनशैलीचे प्रदर्शन करत विविध दावे करण्यात येत आहेत. काही व्हिडिओंमध्ये चमत्कारिक शक्ती असल्याचे सूचित करत लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, या प्रकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सामान्य नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक व मानसिक शोषण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी व्हायरल व्हिडिओंच्या आधारे तपास सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. कल्याण परिसरात वाढत चाललेल्या अशा घटनांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.