ठाणेकर कुसुम द्विवेदी ‘मिस महाराष्ट्र २०२६’; हैदराबादमध्ये किताब पटकावून राज्याचा मान उंचावला
ठाणे : ठाण्यातील काजुवाडी, वागळे इस्टेट येथील रहिवासी कुसुम द्विवेदी हिने हैदराबाद येथे पार पडलेल्या The Infinity Miss India 2026 स्पर्धेत ‘मिस महाराष्ट्र 2026’ (स्टेट विनर) हा मानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या यशामुळे ठाणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
कुसुमने आपल्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, आकर्षक सादरीकरण आणि प्रभावी स्टेज प्रेझेन्सच्या जोरावर देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत हा किताब मिळवला. तिच्या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि पेजंट क्षेत्रातील अनुभवाची जोड असल्याचे दिसून येते.
यापूर्वीही कुसुमने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘Queen of Thane 2025’ हा किताब जिंकत तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. तसेच HERWA Miss India 2026 स्पर्धेत ती ‘फर्स्ट रनर-अप’ ठरली होती.
आपल्या यशाबद्दल बोलताना कुसुम म्हणाली, “महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. माझ्या यशातून तरुण मुलींना स्वतःवर विश्वास ठेवून त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.”
कुसुम द्विवेदी हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.