आधारवाडी कारागृहाबाहेर फटाके प्रकरणी तिघांना अटक; पोलिसांकडून धिंड, एक आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : उल्हासनगरातील कुख्यात आरोपी सतीश उर्फ ‘सत्या भाई’ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमधील आधारवाडी कारागृहाच्या गेटबाहेर फटाके फोडल्याच्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जगदाळे, क्षितीज भगत आणि आकाश खडसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी कारागृहाबाहेर फटाके फोडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप आहे.
अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची परिसरात धिंड काढत इतरांना धडा देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत।