भोंदू ‘कॅप्टन’ खरात प्रकरण गाजतेय; व्हिडिओ व्हायरलनंतर रूपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण

Spread the love

भोंदू ‘कॅप्टन’ खरात प्रकरण गाजतेय; व्हिडिओ व्हायरलनंतर रूपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : स्वयंघोषित ज्योतिषी आणि निवृत्त सैन्य अधिकारी कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित वादाला नवे वळण मिळाले आहे. खरात यांच्यासोबतचे फोटो आणि त्यांचे पाय धुतानाचा रूपाली चाकणकर यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी तीव्र टीका सुरू केली आहे. संविधानिक पदावर असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच आरोपीशी अशा प्रकारे संबंध ठेवले असतील, तर पीडित महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण देत, “कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही माहिती नव्हती. आता जे आरोप समोर येत आहेत, त्यांची पोलीस निष्पक्ष चौकशी करतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे म्हटले.

चाकणकर यांनी पुढे सांगितले की, सामाजिक कार्याच्या निमित्ताने त्या एका ट्रस्टशी जोडल्या गेल्या होत्या. “शिवनिका संस्थान ट्रस्ट हा महादेव देवस्थानाशी संबंधित असून, येथे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्या माध्यमातून अनेक मान्यवर व्यक्तींप्रमाणेच आमचाही संबंध आला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॅप्टन अशोक खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर लैंगिक शोषणासह गंभीर आरोप असून, पोलिसांनी जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, काही नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. विरोधकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, महिला आयोगाच्या पदाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि त्यातून पुढे येणारे निष्कर्ष याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon