वाशीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मध्यरात्री धडक; गोवा निर्मित विदेशी दारूसह कार जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
धाराशिव : वाशी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मध्यरात्री टाकलेल्या धाडीत गोवा राज्यातच विक्रीस असलेली विदेशी दारू अवैधरित्या साठवून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत मारुती स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ९ लाख ४९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे (दक्षता व अंमलबजावणी), विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर (छत्रपती संभाजीनगर विभाग) तसेच अधीक्षक हर्षवर्धन शिंदे (राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी वाशी–पारा रोडवरील सर्वे क्रमांक १६६ येथील कच्च्या बांधकामाच्या घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. या ठिकाणी गोवा राज्य निर्मित आणि केवळ गोव्यात विक्रीस असलेली विदेशी दारू अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट डिझायर (MH-12-NX-4536) ही चारचाकी कारही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आकाश कुमार शेरकर (वय २२, रा. वाशी) व सुनिल सुरेश कवडे (वय ३५, रा. भवानीनगर, वाशी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० या वेळेत पार पडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना वाशी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. निरीक्षक बाळकृष्ण त्रिंबक ढोकरे यांच्या पथकाने केली. या पथकात ए. ए. गवंडी, टी. एच. नेर्लेकर, ए. सी. खराडे, ए. डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, संग्राम झेंडे, ज्ञानेश्वर गुंजाळ आणि चैतन्य मोरे यांचा सहभाग होता. पुढील तपास प्र. निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीबाबतची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी, असे आवाहन अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांनी केले आहे.