कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना; या घटनेमुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील आंबिवली पाटील नगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकले जात आहेत. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवलीत नशेखोर लोक कायदा हातात घेऊन धिंगाणा घालत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.नागरिकांना मारहाण करणे,शिविगाळ करणारे नशेखोर अंमली पदार्थांची विक्रीही करत असल्याचं म्हटलं जात आहे.या नशेखोरांचा नाहक त्रास आंबिवली नगरमधील वस्तीत राहणाऱ्या लोकांना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकले जात आहेत. यामुळे लहान मुले,वयोवृद्धांना प्रचंड त्रास होतो. स्थानिक नागरिक सतीश यादव यांनी यासंदर्भात वारंवार खडकपाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मात्र पोलिस कारवाई करु असे सांगतात.पण कारवाई करत नाहीत.दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळं लोकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची तक्रार करण्यास सांगितलं. पण पुढे याबाबत काही ठोस पावलं उचलली गेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या परिसरात नशेखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.पण त्याला काही लोकांचा विरोध आहे. या विरोधामुळे नशा विक्री करणारे लोक कायदा हातात घेतात. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.