मुंबईच्या धारावी परिसरात जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह, आरोपी पतीला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील धारावी परिसरात एका ५८ वर्षीय भंगार विक्रेत्याने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आपल्यावर जादूटोणा करते, या संशयातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी अमृत मेघा सोलंकी (५८) हा धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत आपली पत्नी सूरजबेन सोलंकी (५२) सोबत राहत होता. १३ मार्च रोजी दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना घडली. अमृतने पत्नीच्या डोक्यात पाण्याची बॉटल मारून आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.दाम्पत्याचा मुलगा शिवराम सोलंकी (३३) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील गेल्या तीन वर्षांपासून आईचा छळ करत होते. “आई आणि मुले मिळून माझ्यावर ‘करणी’ (जादूटोणा) करतात आणि मुले फक्त आईलाच साथ देतात,” असा अमृतचा समज होता. त्याने आपल्या मुलांना घरात येण्यासही बंदी घातली होती. ११ मार्च रोजी झालेल्या एका वादात अमृतने “एके दिवशी मी तुझ्या आईला मारून टाकीन,” अशी धमकीही दिली होती.
बुधवारी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला. घर आतून बंद होते आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नव्हता. शिवरामने वडिलांना फोन केला असता, अमृतने ‘व्हिडिओ कॉल’ उचलण्यास सांगितले.व्हिडिओ कॉल सुरू होताच शिवरामला मोठा धक्का बसला. त्याचे वडील रक्ताने माखलेले होते. अमृतने कॅमेरा फिरवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा मृतदेह दाखवला आणि ओरडून सांगितले, “सगळ्यांना बोलाव, मी तुझ्या आईला बाटलीने मारून आणि गळा दाबून संपवलं आहे.”
शिवरामचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजबेन यांना सायन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून अमृत सोलंकीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.