भाजप नगरसेवकाची थेट फडणवीसांना मागणी; मुंबईचा वडा-पाव वाचवा, पावाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या

Spread the love

भाजप नगरसेवकाची थेट फडणवीसांना मागणी; मुंबईचा वडा-पाव वाचवा, पावाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – इराण- इस्त्राईल युद्धामुळे उद्भवलेल्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईचे चटके आता थेट मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या ‘पाव’ला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील बेकऱ्यांना होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरात पाव आणि ब्रेडचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एवढच नाही तर नार्वेकर यांनी सरकारला बेकरीसाठी लागणारा इंधनपुरवठा अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्याची तसेच लाकूड, कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या ओव्हनचा तात्पुरता वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

फडणवीस आणि गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे की, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्यामुळे मुंबईत पाव आणि ब्रेडची टंचाई निर्माण होत आहे. मुंबईतील सुमारे ८०० बेकऱ्यांपैकी जवळपास ३५० मोठ्या बेकऱ्या आता गॅसवर चालणाऱ्या ओव्हनवर अवलंबून आहेत आणि त्या मिळून शहरातील जवळपास ७०% पाव आणि ब्रेडचा पुरवठा करतात. महापालिकेच्या निर्देशांनुसार गॅसवर चालणाऱ्या ओव्हनचा अवलंब केलेल्या अनेक बेकऱ्यांना सध्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस-आधारित प्रणाली स्वीकारल्यानंतर अनेक बेकऱ्यांनी आपले पारंपरिक लाकूडफाटा वापरणारे ओव्हन नष्ट केले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत बेकऱ्यांना विद्यमान उपकरणांमध्ये बदल करून लाकूड, कोळसा किंवा डिझेलवर चालणाऱ्या पर्यायी ओव्हन प्रणालींचा तात्पुरता वापर करावा लागू शकतो. त्यामुळे एलपीजी चे प्राधान्याने वाटप बेकरीसाठी होण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्याची गरज आहे. तसेच एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती स्थिर होईपर्यंत लाकूड, कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या ओव्हनचा तात्पुरता वापर करण्यास परवानगी द्यावी आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत योग्य अधिकारांचा वापर करावा, असेही भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon