पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून दोन मित्रांकडून एका मित्राची हत्या; दोघांना अटक करण्यात पोलीसांना यश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गोरेगाव पूर्व परिसरात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळला होता. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून दोन जणांनी दगडाने डोक्यावर वार करून हा खून केला. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गोरेगाव पूर्वेकडील हनुमान टेकडी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी मेट्रोचा खांब क्रमांक ७/३८८ जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. स्थानिकांनी तातडीने त्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अजहर असल्याचे समोर आले. तो परिसरात कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करत होता. तसेच तो सुरेश उर्फ कालिया आणि सलीम उर्फ नेपाळी यांच्यासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेनंतर हे दोघेही अचानक फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात अजहरच्या डोक्यावर गंभीर मारहाणीमुळे जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश बने आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाषचंद्र पोस्टुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कन्हेरकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.तपासादरम्यान सुरेश उर्फ कालिया याला हरयाणातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार सलीम उर्फ नेपाळी याच्यासह पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून अजहरचा दगडाने डोक्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली.
कालियाच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी ११ मार्च रोजी मालाड पूर्वेकडील पठाणवाडी परिसरातून सलीम उर्फ नेपाळी याला अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनराई पोलिस करत आहेत.