अंबिवली तलाठी कार्यालयातील खाजगी इसम लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची कारवाई

Spread the love

अंबिवली तलाठी कार्यालयातील खाजगी इसम लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : जमिनीच्या फेरफार नोंदींच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी ‘चहापाणी’च्या नावाखाली लाच मागणाऱ्या अंबिवली येथील तलाठी कार्यालयातील एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी सापळा रचून करण्यात आली.
या प्रकरणात निलेश हनुमान पवार (वय ३५, रा. माल्हेड, ता. मुरबाड) असे ताब्यात घेतलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. तो अंबिवली (ता. कल्याण) येथील तलाठी कार्यालयात काम करत होता.

तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या अशिलांच्या वतीने मोहने गावातील सर्व्हे क्रमांक ४५ हिस्सा ४/१ आणि सर्व्हे क्रमांक ४६/७ या जमिनीच्या वादासंदर्भात तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे दावा दाखल करायचा होता. त्यासाठी संबंधित जमिनीच्या फेरफार नोंदी (१९७६ व २३०५) आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळण्यासाठी त्यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी अर्ज केला होता.

दरम्यान, अर्जाची चौकशी करण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये ते तहसील कार्यालयात गेले असता सदर अर्ज अंबिवली येथील तलाठी कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले असता निलेश पवार यांनी नोंदी जुना असल्याचे कारण सांगत कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली.

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भेटीत पवार यांनी कागदपत्रांची संचिका शोधून तहसीलदार कार्यालयात पाठविण्यासाठी ‘चहापाण्या’च्या नावाखाली ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

एसीबीने १० मार्च रोजी पडताळणी केली असता पवार यांनी ५ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून तलाठी कार्यालयातच सकाळी सुमारे ११.२५ वाजता तक्रारदारांकडून ५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास किंवा कोणी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon