प्रियकराने नंबर ब्लॉक केल्याच्या नैराश्यातून तरुणीची वाशी खाडी पुलावरून उडी; मच्छिमारांच्या धाडसाने वाचले प्राण
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : प्रियकराने फोन नंबर ब्लॉक केल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका तरुणीने वाशी खाडी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, स्थानिक मच्छिमारांच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने नैराश्याच्या भरात वाशी खाडी पुलावरून पाण्यात उडी घेतली. त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छिमार महेश सुतार आणि त्यांच्या साथीदारांनी तातडीने धाव घेत पाण्यात उतरून तरुणीला बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, स्थानिक मच्छिमारांनी दाखवलेल्या धाडसामुळे तरुणीचा जीव वाचला असून परिसरात त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.