पोलीस महासंचालकांच्या बनावट स्वाक्षरीची नोटीस पाठवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती; ज्येष्ठ नागरिकाकडून २.२५ कोटींची उकळपट्टी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल २ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी किशन मकवाना (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणाऱ्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नोव्हेंबर २०२५ मध्ये दोन जणांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत दूरध्वनीवर संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून जम्मू आणि काश्मीर येथील एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्या खात्यात दहशतवादाशी संबंधित रकमेचा व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणातून सुटण्यासाठी तपासात सहकार्य करावे लागेल, अन्यथा अटक करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. तसेच व्हॉट्सअॅपवर बनावट अटक वॉरंटही पाठवण्यात आले.
यानंतर १८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान पीडित ज्येष्ठ नागरिकाला वारंवार धमकावत ‘तपासातून वाचवण्यासाठी’ पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. भीतीपोटी त्यांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २ कोटी २५ लाख रुपये वर्ग केले. मात्र पैसे हस्तांतरित झाल्यानंतर आरोपींचे संपर्क क्रमांक अचानक बंद झाले. त्यानंतर आपण सायबर फसवणुकीचा बळी ठरलो असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासात समोर आले की, आरोपी किशन मकवाना हा सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या संपर्कात होता आणि या फसवणुकीसाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत फसवणूक करण्याची ही चौथी घटना असून अशा सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.