देहू फाट्यावर महिलेचा भररस्त्यात अश्लील धिंगाणा; ‘५०० रुपयांची ऑफर’, पिटा कायद्यांतर्गत गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील देहू फाटा येथे भररस्त्यात अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अडवणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिलेने ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायालाच ५०० रुपयांची अश्लील ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ मार्च रोजी दुपारी सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास देहू फाटा–डुडुळगाव रोडवरील बंन्सीलाल कापड दुकानाजवळ घडली. आरोपी लता नवनाथ पाटील (वय ५२, रा. चंदननगर, पुणे) ही सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव करत अडवत होती. दरम्यान, ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायालाच तिने “चल येतोस, ५०० रुपये दे…” असे म्हणत अश्लील प्रस्ताव दिल्याने परिसरात खळबळ उडाली.
या प्रकारामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाला असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलेविरुद्ध ‘अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६’ (पिटा) च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेला भारतीय न्याय संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी परिसरात अधिक दक्षता वाढवली आहे.